काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली व अजित पवार जवळपास ४० आमदार घेऊन बाहेर पडले व सत्ताधारी गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर अनेक आरोप केले. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार व शरद पवार यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू आहे. प्रचार सभेत दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांना राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. ते आणखी पाच-सहा दिवस थांबले असते तर निश्चितच त्यांची इच्छा पूर्ण झाली असती. कारण माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार तसा निर्णय घेणार होते.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी हा दावा केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे राष्ट्रवादी फुटल्याचे बोलले जाते, तुमच्यावर तसा दबाव नव्हता का? यावर जंयत पाटील म्हणाले, तसा प्रयत्न माझ्याही बाबतीत एकदा झाला. मी पूर्ण एक दिवस तिथं हजेरी लावून आलो. मात्र त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उच्चार करताच आमच्या पक्षातील सगळेच तिकडे गेल्याचा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल असे कुणालाच वाटले नव्हते. कारण पक्ष नव्हे तर एक कुटूंब म्हणून शरद पवारांनी सर्वांना जपले होते. अनेकांच्या चुका, उणिवा सांभाळून घेतल्या होत्या. अनेक नेते शरद पवारांनी घडवले. मात्र पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करताच आमचा पक्ष फुटला. या फुटीला कोणताही तात्विक आधार नाही, पक्ष का फुटला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यांनी व्हावं असं तुम्हाला वाटतं, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले कोणीही नाही. तसेच बारामतीत सुप्रिया सुळे विजय होणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. मात्र सांगलीच्या प्रश्नाच्या ते म्हणाले की, सांगलीबाबत मला निश्चित माहिती नाही. मात्र एक पक्के आहे की, तेथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही.