मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jayant Patil : ४० गावातील लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊ नका, जयंत पाटलांनी कर्नाटकला सुनावलं
जयंत पाटील
जयंत पाटील

Jayant Patil : ४० गावातील लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊ नका, जयंत पाटलांनी कर्नाटकला सुनावलं

23 November 2022, 23:05 ISTShrikant Ashok Londhe

Jayant Patil On Karnataka : जत तालुक्यातील गावांची कर्नाटकात जाण्याची मागणी २०१६ मधील आहे. आता त्यांची अशी कोणतीही भावना नाही. कर्नाटकनेही येथील लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊ नये, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावे कर्नाटकात सामील होत असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकरण तापलं आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकला इशारा दिला आहे की, सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करत आहे. जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये.

ट्रेंडिंग न्यूज

जयंत पाटील म्हणाले की, म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी जत तालुक्यातील ६५ गावांपर्यंत जात नव्हते. पाण्यासाठी या गावातील लोकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचा कार्यभार माझ्याकडे असताना ११ ऑगस्ट २०२१ ला वारणा नदीच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्यास मान्यता दिली आणि या फेरनियोजनामुळे अतिरिक्त ६ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. म्हैसाळ प्रकल्प माध्यमातून या ६४ गावांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मी स्वतः या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि फार कमी काळात हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला. कोरोना काळातही या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर होते, असे जयंत पाटील म्हणाले.

या प्रकल्पाबाबत महाविकास आघाडीने कोणतीही दिरंगाई केली नाही. प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असून शिंदे सरकारने प्रकल्प पुढे घ्यावा आणि त्याला मान्यता द्यावी व प्रकल्प सुरू करून टाकावा असेही जयंत पाटील यांनी सरकारला सांगितले. आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्हाला कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका २०१६ साली येथील ग्रामस्थांनी मांडली होती. आज या गावकऱ्यांची तशी कोणतीही भावना नाही. जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाहीत, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.