जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर चांगलीच टोलेबाजी केली. तसेच जालना येथे झालेल्या लाठीचार्ज घटनेवर सरकारले पुन्हा घेरलं. राज्यात तुमचं सरकार, तुम्हाला न विचारता पोलिसांकडून लाठीचार्ज होत असेल, तर सरकारमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार आहे का, असा सवाल जयंत पाटील केला आहे.
पोलीस तुम्हाला न विचारताच शांततेत सुरू असलेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांना मारहाण करत असतील तर सरकार म्हणून तुम्ही काय करता? असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, तुमचं आदेश आम्ही दिलेत हे सिद्ध करा, हे चॅलेंज म्हणजे महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही न पटणारं आहे, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट म्हटलं होतं की, जर मंत्रालयातून आदेश आले हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवलं तर आम्ही राजकारण सोडू. चला दुध का दूध पाणी का पाणी होऊ दे. आम्ही कोणी तिघांनी आदेश दिले असतील ना, तर सिद्ध करावं. आम्ही राजकारणातून बाजूला होऊ.
अजित पवारांच्या या विधानाचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. तसेच, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न विचारता पोलीस लाठीचार्ज करत असतील तर तुम्ही काय करता?, असा सवालही जयंत पाटील यांनी विचारला.
तसेच आता नव्याने तुम्ही ज्या शाळेत गेला आहात, त्या शाळेचा मुख्याध्यापकही शरद पवारांकडून ट्युशन घ्यायला येतो, अशा शब्दात जयंत पाटलांनी टीका केली. “मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो”, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची जयंत पाटलांनी आठवण करून दिली.
एकनाथ खडसे म्हणाले की, पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, लाठीचार्ज करायच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या. मग हा वरिष्ठ कोण असू शकतो, त्यांच्यापेक्षा जो वरिष्ठ आहे तोच असू शकतो. एखादी घटना घडली तर त्याची अंतिमत: जबाबदारी गृह मंत्रालयाची असते. गृहखात्याच्या मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वेमंत्री राजीनामा, गोवारीचं हत्याकांड झालं तर मंत्र्याचा राजीनामा. मग, इथं लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही असं म्हणण योग्य नाही, ती त्यांचीच जबाबदारी आहे. दरम्यान, मी राजीनामा मागणार नाही. कारण, देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील, असं वाटत नाही, असा चिमटा खडसेंनी आपल्या भाषणात काढला.