मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेला शरद पवारांचा तो विश्वासू नेता कोण?

Sharad Pawar : भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेला शरद पवारांचा तो विश्वासू नेता कोण?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 19, 2024 03:41 PM IST

NCP Sharad Pawar : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेमुळं सध्या राजकारण ढवळून निघालं आहे.

Nationalist Congress Party Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party Sharadchandra Pawar (Sandeep Anandrao Mahankal)

Political Buzz about Jayant Patil : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपनं आता पवारांना आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. पवार यांचा अत्यंत विश्वासू नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हा नेता कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

भाजपच्या संपर्कात असलेला आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असलेला हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनिल देशमुख, जयंत पाटील असे काही मोजकेच जुने आणि जाणते आता शरद पवारांसोबत आहेत. त्यापैकी अनिल देशमुख हे विदर्भातील आहेत. तर, जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळं तेच भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा आहे.

भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. यावेळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा चंग भाजपनं बांधला आहे. खुद्द नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तसं सांगितलं आहे. हे गणित जुळवून आणायचं असल्यास निवडून येणारे व एका पेक्षा जास्त मतदारसंघावर प्रभाव असलेले नेते पक्षात असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडूनही लोकसभेला अपेक्षित यश मिळेल की नाही याबाबत भाजपला साशंकता आहे. त्यामुळंच जितके नेते येतील तितके घ्यायचे असा सपाटाच भाजपनं लावला आहे.

नांदेड जिल्ह्यात राजकीय ताकद असलेल्या अशोक चव्हाण यांना गळाला लावल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडं असलेले एकमेव मोठे नेते जयंत पाटील यांना आपल्या गोटात घेण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. तर, जयंत पाटील हे दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य करणार आहेत. ते काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जयंत पाटील यांच्यावर शरद पवारांची मोठी भिस्त

अजित पवार यांच्या पुढाकारानं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही शरद पवार आजही लढण्याच्या भूमिकेत आहेत. या लढाईमध्ये पवारांची जयंत पाटील यांच्यावर भिस्त आहे. जयंत पाटील हे राजकारणात अनुभवी आहेत. हजरजबाबी आहेत. कुशल संघटक आहेत. आतापर्यंत सरकारमध्ये आणि पक्ष पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आजही ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी एकसंध असताना शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याला कडाडून विरोध करणारे जयंत पाटील हे एकमेव नेते होते. पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय न पटल्यानं त्यांना अक्षरश: रडू कोसळले होते. त्यामुळं जयंत पाटील यांच्याबद्दल सध्या सुरू असलेली चर्चा खरी आहे की अफवा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

WhatsApp channel