मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पात फार मोठ्या घोषणान करता आधीच्या योजनांचे यश सांगण्यावर अर्थमंत्र्यांनी भर दिला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजच्या अंतरिम अर्थसंकल्पावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
आज सादर झालेल्या अर्थसंकल्प निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की,
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे ,असा प्रश्न मला पडतो. या अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही," असा टोलादेखील जयंत पाटील यांनी लगावला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अंतरिम बजेट हा देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गेल्या ९ वर्षात केंद्रातील मोदी सरकारच्या योजना अपयशी ठरल्या असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतरिम अर्थसंकल्प मांडतांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मागील १० वर्षांतील देशाच्या प्रगतीतील सकारात्मक आकडेवारी जाणीवपूर्वक मांडण्याचं व नकारात्मक आकडेवारी झाकण्याचं राजकीय चातुर्य दाखवलं आहे. नवीन हॉस्पिटलस्, कॉलेज, नव्या योजना अशा घोषणा कोणत्याही पक्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात होतात. त्याची अंमलबजावणीही कमी जास्त प्रमाणात होतंच असते, मात्र निवडणूक असूनही कर पद्धतीची पुनर्रचना, विशिष्ट घटकांसाठी भरगोस तरतूद अशा कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता, समतोल अर्थसंकल्प मांडला गेला आहे. यातूनच निवडणुकांना सामोरं जाताना सरकारचा राजकीय आत्मविश्वास दिसून येतो, आता हा आत्मविश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या