Jay Ajit Pawar In Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील बारामतीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाचे नेते, समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार हे देखील राजकारणात सक्रिय झाल्याचं चित्र बारामतीच्या सभेतून पाहायला मिळालं. अजित पवारांच्या सभेवेळी जय पवार हे नेते आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री पवारांच्या आसपास दिसत होते. त्याचवेळी 'तुम्ही बारामतीची सूत्र हातात घ्या, अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय', असं म्हणत कार्यकर्त्यांनी जय पवारांना बारामतीतून निवडणूक लढण्याची मागणी केली. त्यावर जय पवारांनी केवळ स्मितहास्य करत कोणतंही वक्तव्य करणं टाळलं आहे. परंतु आता अजित पवारांच्या सभेत सक्रियता दाखवत जय पवारांच्या राजकारणाचा श्रीगणेशा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेष्ठ सुपूत्र पार्थ पवार यांनी मावळमधून २०१९ साली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला होता. परंतु आता ऐन लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचे धाकडे चिरंजीव जय पवार देखील राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या बारामतीतील सभेत कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळं चर्चांना जोर आला आहे. सभेसाठी अजित पवार बारामतीत दाखल होताच जय पवार यांनी कार्यकर्ते, नेत्यांसह त्यांचं जंगी स्वागत केलं. अजित पवारांच्या ताफ्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी, फुलांची उधळण आणि क्रेनने हार घालण्याची युक्ती जय पवारांचीच होती, अशी चर्चा राजकीय गोटात चांगलीच रंगली आहे.
कार्यकर्त्यांनी राजकारणात येण्याची विनंती केल्यानंतर जय पवार म्हणाले की, 'तुम्ही अजित पवारांशी बोलून घ्या. मला ग्रीन सिग्नल मिळाला की मी लगेच तयारीला लागतो', असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळं आता आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्यासह जय पवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत अजित पवारांचे दोन्ही सुपूत्र एकत्र राजकीय कार्यक्रमात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
संबंधित बातम्या