Sangali jat girl Murder : सांगली येथे जत येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून एका मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी तिच्या महाविद्यालयातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. दरम्यान, खुनाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी भरदिवसा गजबजलेल्या सोलनकर चौकात खून झाला होता. त्यानंतर हा दुसरा खून निर्जन अशा वाड्यात झाला आहे.
अक्षता सदाशिव कोरे (वय २१, रा. सैनिकनगर, जत) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. अक्षताचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. अक्षता ही जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडील हे कापड व्यापारी आहेत. अक्षताला सोमवारी सकाळी ७ वाजता तिच्या वडिलांनी महाविद्यालयात सोडून दिले. यानंतर ते कामावरून निघून गेले. दरम्यान, ११.३० च्या सुमारास महाविद्यालय सुटते. मात्र, अक्षता ही दुपारी ३ वाजले तरी घरी पोहचली नाही. यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्या नातेवाइकांकडे विचारपूस केली. मात्र ती त्यांच्याकडे नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या एका राजवाड्याच्या भागात गुरे चारण्यासाठी आणलेल्या काही जणांना एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारीदेखील दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, हा मृतदेह हा अक्षताचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटणस्थळाची आणि मृतदेहाची पाहणी केली. अक्षताचा गळा आवळून खून करण्यात आला होता. ही घटना दुपारी १२. ते १ च्या सुमारास घडल्याचा पोलिसांचा दावा आहे.
हा खून प्रेम प्रकरणातून झाल्या असल्याचा संशय पोलिसांना प्राथमिक तपासातून आला. घटनास्थळी त्यांना एक ओळखपत्र सापडले. त्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला अटक केली. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. अक्षताचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.