Kolhapur Santaji Ghorpade attack: राज्यात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे राण करत आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून कोल्हापूर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरात करवीर विधानसभा मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. संताजी घोरपडे हे प्रचार दौऱ्यावरून घरी परतत असतांना रविवारी रात्री हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार आटोपून त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह कोल्हापूरला जात होते. ते मनवाड येथे आले असता त्यांची गाडी काही लोकांनी अडवली. पक्षाचे कार्यकर्ते असतील असे समजून त्यांनी गाडी थांबवली. त्यांच्याशी बोलण्यासाठी ते घराबाहेर पाडले असता, सात ते आठ जणांनी त्यांच्यावर काठ्या, भाल्यासह हल्ला केला. या घटनेत संताजी घोरपडे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना परतवून लावले आहे. त्यांनच्या सहकाऱ्यांनी कसाबसा हा हल्ला परतावून लावला. दरम्यान, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगड फेक करत पळून गेले. या प्रकरणी संताजी घोरपडे यांनी कळे पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होते. याचा शोध पोलिस घेत आहेत. तपास पथके रवाना करण्यात आले आहेत.
कोल्हापुरात करवीर मतदार संघ लक्ष्यवेधी मतदार संघ आहे. या ठिकाणी तिहेरी लढतीचे चित्र आहे. संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार असून हा हल्ला राजकीय वादातून करण्यात आला का याचा तपास केला जात आहे. दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचे जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी ६ वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर देखील संताजी घोरपडे प्रचार करणार का ? या कडे लक्ष लागले आहे.