जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील एका न्यायालयाच्या पुरावा कक्षात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरावा म्हणून आणलेल्या ग्रेनेडचा स्फोट होऊन एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा देत गुरुवारी याबाबत माहिती दिली. बारामुल्ला न्यायालयाच्या आवारात असलेल्या पुरावा कक्षात दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पुरावा म्हणून आणलेल्या ग्रेनेडचा मालखान्यात चुकून स्फोट झाला आणि त्यात एक पोलिस जखमी झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची ग्वाही दिली आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या सरन्यायाधीशांच्या कोर्ट भेटीच्या आधी ही घटना घडल्याने न्यायालयाच्या आवारातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा दल या भागात शोध घेत आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर संभाव्य धोक्यांचा तपास अधिकारी करत आहेत.
दरम्यान, काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी एका आठवड्यात तिसऱ्यांदा बिगर काश्मिरी कामगारांना लक्ष्य करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. गुरुवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरींना लक्ष्य करत उत्तर प्रदेशातील एका मजुरावर गोळ्या झाडल्या होत्या.
या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी रविवारी गांदरबलमध्ये एका बांधकाम साइटवर झालेल्या हल्ल्यात सहा स्थलांतरित मजूर आणि एका स्थानिक डॉक्टरचा मृत्यू झाला होता. १८ ऑक्टोबर रोजी शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली होती.
संबंधित बातम्या