Jalgoan: धाकट्या भावाला बुडताना पाहून थोरल्याची पाण्यात उडी, दोघांचाही बुडून मृत्यू; जळगाव येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgoan: धाकट्या भावाला बुडताना पाहून थोरल्याची पाण्यात उडी, दोघांचाही बुडून मृत्यू; जळगाव येथील घटना

Jalgoan: धाकट्या भावाला बुडताना पाहून थोरल्याची पाण्यात उडी, दोघांचाही बुडून मृत्यू; जळगाव येथील घटना

Oct 14, 2024 10:03 AM IST

Two brothers drown In Jalgoan: जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

जळगाव: दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू
जळगाव: दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू (HT)

Jalgoan News: जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१३ ऑक्टोबर २०२४) सायंकाळी घडली. धाकट्या भावाला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी थोरल्या भावाने पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. या घटनेने सालबर्डी गावावर शोककळा पसरली आहे.

वेदांत कृष्णा ढाके (वय, १६) आणि चिराग कृष्णा ढाके (वय, ११) अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत आणि चिराग हे दोघेही रविवारी दुपारी केस कापून आल्यानंतर सालबर्डी शिवारातील तलावावर पोहण्यासाठी गेली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चिराग बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी वेदांतने पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले.

मृतांचे वडील रिक्षा चालवून तर, आई शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पोटच्या दोन्ही मुलांचा मृतदेह पाहिल्यानंतर आई- वडिलांनी एकच टाहो फोडला. त्यांच्या या आक्रोशाने उपस्थितांचे देखील डोळे पाणावले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील ७ जण ठार

हरयाणातील कैथल जिल्ह्यात कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि चार मुलींचा समावेश आहे. या कारमध्ये एकाच कुटुंबातील आठ सदस्यांसह नऊ जण होते. दसऱ्याला झालेल्या बाबा राजपुरी मेळाव्यासाठी ते निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी मुंद्री गावाजवळ कालव्यात कोसळली. चालकाला वाचवण्यात यश आले. मात्र, कारमधील इतर सात जण पाण्यात बुडाले. कोमल नावाची १२ वर्षांची मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांमध्ये सतविंदर (वय, ५०), चमेली (वय, ६५), तीजो (वय, ४५), फिजा (वय, १६), वंदना (वय, १०), रिया (वय, १०) आणि रमणदीप (वय, ६) यांचा समावेश आहे. हे सर्व जण कॅथलमधील डीग गावचे रहिवासी होते.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर