Pushpak Express Accident : आगीच्या अफवेची एक बोंब उठली ११ प्रवाशांच्या जीवावर, जाणून घ्या जळगाव रेल्वे अपघाताचा थरार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pushpak Express Accident : आगीच्या अफवेची एक बोंब उठली ११ प्रवाशांच्या जीवावर, जाणून घ्या जळगाव रेल्वे अपघाताचा थरार

Pushpak Express Accident : आगीच्या अफवेची एक बोंब उठली ११ प्रवाशांच्या जीवावर, जाणून घ्या जळगाव रेल्वे अपघाताचा थरार

Jan 22, 2025 07:31 PM IST

Pushpak Express Accident : लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच हा अपघात झाला. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली.

पुष्पक ट्रेनमध्ये आगीच्या अफवेनंतर मोठी दुर्घटना
पुष्पक ट्रेनमध्ये आगीच्या अफवेनंतर मोठी दुर्घटना

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर बुधवारी (२२ जानेवारी) भीषण रेल्वे अपघात झाला. लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर ही घटना घडली. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली व अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली. उडी मारून जवळच्या दुसऱ्या ट्रॅकवर आले, जिथे दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात कसा झाला?

जळगाव ते पाचोरा स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात होती, तर कर्नाटक एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेने जात होती. पुष्पक एक्स्प्रेसच्या खालून धूर निघताना दिसला, त्यानंतर ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली. अनेक प्रवाशांनी घाबरून चालत्या रेल्वेतून उडी मारली. पुष्पक एक्सप्रेसच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे घाबरून लोकांनी आग लागल्याची बोंब ठोकली, मात्र उष्णतेमुळे धूर निघत होता, आग लागली नव्हती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना पोचारा स्टेशनच्या जवळ एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक दाबला. यामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. दरवाजात जे प्रवासी बसले होते, त्यांनी आग लागल्याची आरडाओरड करत पळापळ सुरू केली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी पुढचा मागचा काहीच विचार न करता रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. दुसऱ्या बाजूने  कर्नाटक एक्स्प्रेस दिल्लीकडे जात होती. या ट्रेनचा हॉर्न ऐकू न आल्याने या एक्सप्रेसखाली अनेक प्रवासी चिरडले गेले. पुष्पक एक्स्प्रेस आता पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ थांबवण्यात आली

मदत व बचाव कार्य सुरू -

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना पाचोरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसपी, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी ही घटनास्थळी रवाना झाले आहेत. डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे. आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून रेल्वेच्या अतिरिक्त रेस्क्यू व्हॅन आणि अॅम्ब्युलन्सही पाठविण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह जळगावला पाठविण्यात आले आहेत.

जखमींना तातडीने मदत करा – फडणवीस 

या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जळगाव रेल्वे अपघातावर पोस्ट केली आहेत्यांनी म्हटले की, आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून असून जखमींना तातडीने मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर