Jalgaon News: दांडिया खेळताना तरुण अचानक कोसळला अन् कुटूंबाचा आधार गेला; पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon News: दांडिया खेळताना तरुण अचानक कोसळला अन् कुटूंबाचा आधार गेला; पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना

Jalgaon News: दांडिया खेळताना तरुण अचानक कोसळला अन् कुटूंबाचा आधार गेला; पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना

Oct 04, 2024 10:47 PM IST

Jalgaon News : जळगावातील पाचोरा शहरात एका २७ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू
दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू

गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावारण असून रास गरबा, दांडियाची धूम आहे. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात जळगावातून एक दु:खद घटना समोर आली आहे. जळगावातील पाचोरा शहरात एका २७ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लखन वाधवाणी असे मृत्यू झालेल्या तरुणाची नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली. गुरुवारी रात्री नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा खेळत असताना अचानक चक्कर आली आणि हा तरुण खाली कोसळला. लोकांनी त्याला तात्काळ उचलून रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सिंधी कॉलनी रोडवर गरबा महोत्सवाचे आयोजन केले होते. दांडिया खेळत असताना सिंधी कॉलनी येथील रहिवासी असलेल्या लखन वाढवानी याला अचानक चक्कर आली व तो खाली कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्याने लखनचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे पाचोरा शहरावर शोककळा पसरली आहे.

कुटूंबाचा आधार हरपला -

लखन वाधवाणी सिंधी कॉलनी येथील अतिशय गरीब कुटुंबातील तरुण होता. रमेशलाल वाधवाणी यांचा तो एकुलता एक मुलगा होता. लखन चाळीसगाव येथील पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. त्याचे वडील बूट चप्पलच्या दुकानात कामाला होते. दोघे कष्ट करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. लखन दांडिया खेळण्यात माहिर होता. तो मागील वर्षी एका मंडळामध्ये दांडिया किंग देखील ठरला होता. लखनला डॉक्टरांनी मृत घोषित करताच त्याच्या कुटुंबाने मोठा आक्रोश केला. त्यांच्या कुटूंबाचा आधार हरपल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर