Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा राडा झाला. दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत काही दुकाने जाळली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहन चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणातून हा राडा झाला आहे. पाळधी गावचे काही तरुण व शिवसेनेचे काही कार्यकर्ते भिडले असून संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक करत तब्बल १२ ते १५ दुकाने पेटवून दिली.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरचे बाहेर जात होते. यावेळी त्यांच्या वाहन चालकाने हॉर्न वाजवल्याने व त्यांच्या गाडीचा कट लागल्याने वाद सुरू झाला. यावेळी गाडीवरील तरुणांनी चालकाला शिवीगाळ देखील केली. दरम्यान, वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आले. सुरवातीला पाळधी गावचे काही तरुण व शिवसेनेचे काही कार्यकर्ते या वादावरून भिडले. यानंतर गावात मोठा तणाव झाला. संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक केली. यानंतर काही दुकानांना आग लावली. तब्बल १२ ते १५ दुकाने जाळली असून यात मोठं नुकसान झालं आहे.
या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तो पर्यंत राडा करणारे सर्व जण पळून गेले होते. पोलिसांनी व स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्रीपासून पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेला कारणीभूत असलेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावात पुन्हा राडा होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस गावात गॅसत घालत असून पळून गेलेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.