Nepal Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी एक मोठा अपघात झाला. भारतातील काही भाविकांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा हा २७ वर पोहोचला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील भाविकांची मोठी संख्या आहे. तर काही नागरिक अद्याप बेपत्ता आहे.
नेपाळ पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ४० प्रवाशांना घेऊन जाणारी एक भारतीय प्रवासी बस शुक्रवारी तानाहुन जिल्ह्यातील मर्स्यांगदी नदीत कोसळली. या बसमध्ये भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील ८० नागरिक ही देव दर्शनासाठी गेले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. या बस दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या सोबत संवाद साधला असून हवाई दकळच्या विशेष विमानाने हे मृतदेह भारतात आणले जाणार आहेत. या प्रवाशांनी १६ ऑगस्टला त्यांचा प्रवास सुरू केला होता.
हा अपघात झाल्यावर काठमांडू येथील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या बाबत एक्सवर माहिती देण्यात आली आहे. तसेच संपर्क करण्यासाठी ९७७९८५११०७०२१ हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
हवाई दलाच्या विमानाने मृतदेह भारतात आणणार
अमित शहा यांनी या प्रकरणी मदत करण्याचे आश्वासह राज्य सरकारला दिले आहे. त्यांनी तातडीने वायुसेनेच्या विशेष विमान उपलब्ध करून दिले असून या विमानाने हे मृतदेह आज राज्यात परत आणले जाणार आहेत. मृतदेह हे नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणले जाणार आहे. त्यानंतर ते याच विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. व त्यानंतर कुटुंबियांना सुपूर्द केले जाणार आहे.
नदीत कोसळलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरूच आहे. यासाठी नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर वैद्यकीय पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप काही नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध लागलेला नाही. घटनास्थळी आपत्ती निवारण दलाचे कर्मचारी देखील बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.