Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह दोन चिमुकल्यांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना चोपडा तालुक्यात गौऱ्यापाडा येथे मध्य प्रदेशच्या सीमेवरील देवळी गावी घडली.
संजय पावरा (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या पत्नीचे आणि मृत मुलांची नावे समजू शकली नाही. ही घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्याची पत्नी ही १९ वर्षांची आहे. संजयच्या पत्नीला वयाच्या १८ वर्षाआधी दोन मुलं झाली. दोघांचाही संसार चांगला सुरू असतांना. संजयने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. या मुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. या संशयातून त्याने हे भयानक कृत्य केलं आहे.
संजयने घटनेच्या दिवशी पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेतला. यामुळे पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून संजयने रंगाच्या भरात घरातील कुऱ्हाड घेत पत्नीवर व दोन मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीच्या डोक्यावर घाव बसल्याने ती गंभीर जखमी झाली.
घरातून मोठा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांना घरात रक्ताचा सडा दिसला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तसेच आरोपीच्या पत्नीला त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून तीची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, शेजऱ्यांनी आरोपी संजय पावरा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कार्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.