Jalgaon Police Murder News In Marathi: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रविवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. क्रिकेटच्या सामन्यावरून पेटलेल्या वादातून १२ जणांच्या टोळक्याने एका पोलीस हवालदाराची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम अगोने (वय, २८) असे हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शुभम हा पोलीस पोलीस दलात कार्यरत होता. ही घटना घडली तेव्हा तो त्याच्या गावी होता. शुभम हा चाळीसगाव येथे आयोजित क्रिकेट सामना जिंकणाऱ्या संघाचा एक भाग होता. सामन्यानंतर शुभमचे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी शाब्दिक बाचाबाची झाली होती. याचा राग डोक्यात ठेवून प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी रविवारी रात्री शुभम आणि त्याच्या मित्राला घेराव घातला. तसेच तलवारी आणि क्रिकेटच्या स्टंपने त्याला मारहाण केली. या घटनेत शुभमचा मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र आनंदलाही गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मु्ंबई नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका ३९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने शनिवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कैलास गवळी (वय, ३९) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. यामुळे गवळी यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी एडीआर दाखल करून पत्नीचा जबाब नोंदवला.