Jalgaon news : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक ऐन रंगात आली असतांना जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तिने गोळीबार केला आहे. तब्बल तीन राऊंड घराबाहेर पडलेले दिसले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांना अटक करण्यासाठी तपास पथके पाठवले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. रवीवारी प्रचार रंगात असतांना जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. जळगाव शहरात अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद गुलाम हुसैन यांच्या घरावर आज सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास गोळीबार करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले आहे. हल्ले खोरांनी तीन गोळ्या हुसेन यांच्या घरावर झाडल्या. यात त्यांच्या घराच्या काचा फुटल्या आहेत. मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन व त्यांचे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्यांचे घर गाठले. यावेळी घराबाहेर तीन काडतूसे पोलिसांना आढळली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला असल्याची शंका आहे.
दरम्यान, शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. हे संरक्षण त्यांना दिले जाणार असल्याची माहिती आहे. ते एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी जळगाव शहरातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराभोवती मोठी गर्दी केली होती. पोलीस गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.