जळगाव शहरातील प्रताप नगर येथील श्री स्वामी समर्थांचे केंद्र अतिक्रमणात असल्याकारणाने परिसरातील नागरीकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्वामी सेवेकऱ्यांना कळताच सोशल मिडीयावरून एकत्र जमण्याचे ठरले आणि रविवारी एकत्र बैठक घेत संतप्त स्वामी सेवेकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
श्री स्वामी समर्थांचे अनेक सेवेकरी स्वामी समर्थांच्या चरणी भक्तीभावाने आपली सेवा रूजू करतात. महाराष्ट्रात अनेक भागात श्री स्वामी समर्थांचे मठ/केंद्र आहे. असंख्य संख्येने श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी आहे. जळगाव येथेही काही भागात स्वामी समर्थांचे केंद्र असून, मोठ्या संख्येत स्वामी सेवेकरी या मठात सेवेसाठी दररोज दाखल होतात.
शहरातील गणेश कॉलनी, प्रताप नगर येथे असलेले श्री स्वामी समर्थ केंद्रात ही दररोज नित्यसेवा होत होती. परंतू हे केंद्र अतिक्रमणात असल्यामुळे परिसरातील काही नागरीकांनी अतिक्रमण काढण्यासाठी याचिका दाखल केली. स्वामी समर्थ केंद्रातील अनधिकृत बांधकाम व परिसरातील नागरिकांचे या खुल्या भूखंडावर असलेल्या हनुमानाच्या मंदिरात दर्शनावर १८ वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही हे अतिक्रमण काढण्यात आले नाही तेव्हा अॅड सुशील अत्रे यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने संभाजीनगर खंडपीठात त्याबाबत जिल्हा प्रशासन व महापालिकेला अवैध बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन आठवड्यांपूर्वी नगरपालिकेच्या आदेशाने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले. नवरात्रोत्सवात सेवेकरी पाठ करतात त्यामुळे अतिक्रमण काढण्याचे काम थांबले होते आणि शुक्रवारी बुलडोझर आणून केंद्र तोडण्यात आले.
स्वामी समर्थांच्या केंद्रावर बुलडोझर चालवल्यामुळे संतप्त सेवेकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली आणि रविवारी रास्ता रोको केला. संतप्त सेवेकऱ्यांनी इतर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचेही यावेळी सांगितले. तसेच, संबंधित वकिलाने तक्रार मागे घ्यावी तसेच अतिक्रमणाची कारवाई करू नये. स्वामी समर्थ केंद्राच्या जागेचा महापालिकेत ठराव करून ती जागा केंद्राला देण्यात यावी अशा मागण्या यावेळी या आंदोलनात सेवेकरांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी आमदार, महापौर यांनीही सेवेकऱ्यांना पाठिंबा दिला.
संबंधित वकिलाने व्हिडिओ कॉल करून कोर्टात केलेली तक्रार मागे घेण्याचा आश्वासन दिल्यानंतर तसेच महापालिकेत ठराव करून जागा केंद्राला देण्याचा प्रशासनाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.