Jalgaon Accident : जेवणाचे पार्सल आण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय बालकाचा भरधाव डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने रस्त्यातच डंपर पेटवून दिला. शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ बुधवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव डंपर भुसावळकडून जळगावकडे जात होता. या घटनेत ९ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला तर त्याची बहीण व मामा जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत बालकाचे नाव आहे.
योजस हा चिमुकला आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बहाटे (१३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (२५ डिसेंबर) रोजी भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे योजसच्या घरी आले होते. योजस मामा योगेश सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला गाडीवरून निघाला. यावेळी मामा योगेश बेंडाळे व बहीण भक्ती बऱ्हाटे देखील सोबत होते. तिघे दुचाकीने कालिंका माता चौकात आले असून भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
योगेश बेंडाळे हे बुधवारी सव्वा सात वाजता भाची भक्ती आणि भाचा योजस यांना घेऊन दुचाकीने जेवणाचे पार्सल आणण्यासाठी निघाले होते. दुचाकी कालिका माता चौकातून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बहाटे हा चिमुकला जागीच ठार झाला तर बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे जखमी झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला होता. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसंच अग्निशमन दलाला देखील बोलावून आग विझवण्यात आली. मोठ्या संख्येने लोक इथे जमा झाले होते. यावेळी संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठी चार्ज करावा लागला.