Pune kalyani nagar Crime : पुण्यातील कल्याणीनगर येथील एका व्हिलामधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात निवेदिता साबू यांच्या सिग्नेचर कॉउचर या वस्त्रदालनात काही चोरट्यांनी दरोडा घातला. ही घटना बुधवारी रात्री घडली. चोरट्यांनी दालनातील रोख रक्कम व विविध डिझाईनचे कपडे व ॲक्सेसरीज असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास नेला. पोलिसांनी सांगितले की, वॉशरूमची खिडकी फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
निवेदिता साबू या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे (एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांची नात तर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भाची आहे. या प्रकरणी निवेदिता यांचा भाऊ विक्रांत इंदुलकर (वय २६, रा. पाषाण) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, याप्रकरणी बुधवारी दुपारी येरवडा पोलिसांत तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या वस्तुंमध्ये रोख १.५७ लाख रुपयांची रोख रक्कम व ४३ हजार रुपय किमतीचे डिझायनर शर्ट आणि टी शर्ट चोरट्यांनी चोरले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी वस्त्रदालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात तीन चोरटे वस्त्रदालनात चोरी करत असल्याचे आढळून आले.
या बाबत निवेदिता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या महितीनुसार, बुधवारी सकाळी दुकानातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे वस्त्रदालन उघडले असता, चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. दालनातील आतील कपाट तुटलेले होते. तसेच त्यांनी रोख रक्कम आणि पुरुषांचे शर्ट चोरीला गेले होते.
येरवडा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहीतीनुसार, "सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन पुरुष मोटारसायकलवरून दालनाजल आले. त्यांनी आत जाण्यासाठी दालनाच्या वॉशरूमची खिडकी तोंडली. तिन्ही चोरटे तब्बल अर्धा तास आतमध्ये होते. आम्ही कल्याणीनगर पूल आणि पुढे मुंढवापर्यंत चोरट्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहे. गाडीचा नोंदणी क्रमांक देखील शोधला जात आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१व (लपून राहणे किंवा घर तोडणे) आणि ३०५ (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवेदिता साबू या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे (एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांची नात तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाची आहेत. त्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहेत. त्यांनी पुण्यातील कल्याणी नगर येथे २०१२ मध्ये त्यांच्या कपड्यांचे दालन सुरू केले. या सोबत मुंबईत देखील त्यांच्या कपड्याचे दालने आहेत. पॅरिस येथील फॅशनी विकमध्ये साबू यांनी तयार केलेल्या डिझायनर कपड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून अनेक अभिनेते व अभिनेत्रींच्या कपड्यांचे डिझायन निवेदिता यांनी तयार केले आहेत.