israel lebanon war : हिजबुल्लाविरुद्ध युद्ध सुरू करणाऱ्या इस्रायलने सोमवारी सकाळी पहिल्यांदाच लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये लष्कर घुसवलं. इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये अनेक इमारती हवाई हल्ले करून बॉम्बने उडवून दिल्या. या हल्ल्यात किमान ४ नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी गट पीएफएलपीने म्हटले आहे की या हल्ल्यात त्यांचे तीन नेते मारले गेले. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढत्या संघर्षात इस्त्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये घुसून निवासी भागावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बेरूतमधील कोला जिल्ह्यातील एका इमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर इस्रायली लष्कराने पहिला हवाई हल्ला केला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, पॅलेस्टिनी दहशतवादी गट पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन (पीएफएलपी) ने सांगितले की कोला जिल्ह्यात इस्त्रायली हल्ल्यात त्यांचे तीन नेते मारले गेले. यापूर्वी असेही वृत्त आले होते, की या हल्ल्यात अल-जमा अल-इस्लामीया (इस्लामिक गट) या दुसऱ्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला ठार करण्यात आले होते. मात्र, या संघटनेने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
रिपोर्टनुसार, इस्रायली लष्कराने रविवारी रात्रीपासून बेरूतमधील निवासी भागात ड्रोन हल्ले सुरू केले आहे. इस्रायली वृत्तपत्र हायोमने इस्रायली सैन्याच्या हवाल्याने म्हटले आहे की लष्कराने बेरूतमधील बेका भागात हल्ले वाढवले आहेत. आयडीएफने दिलेल्या वृत्तानुसार लढाऊ विमानांनी गेल्या २ तासांत बेका खोऱ्यातील हिजबुल्लाहच्या डझनभर ठिकानांनावर हल्ला केला आहे. लष्कराने असेही म्हटले आहे की ज्या इमारतींवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी रॉकेट लाँचर्स आणि हिजबुल्लाहने शस्त्रे लपून ठेवली होती.
इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहवर हल्ले सुरू केल्यानंतर सौदी अरेबियाने लेबनॉनच्या संघर्षावर त्यांचं मौन सोडत पहिली प्रतिक्रिया दिली. यूएईने देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन इस्राइलला केले आहे. सौदी अरेबिया लेबनॉनवरील हल्ल्यामुळे चिंता व्यक्त करत असल्याचं सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला प्रादेशिक शांतता आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी, या प्रदेशाचे व तेथील लोकांना युद्धापासून दूर करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन देखील केले.