Israel Attack on Iran : इराणने इस्रायलवर १ ऑक्टोबररोजी तब्बल २०० क्षेपणास्त्र डागले होते. त्यामुळे या हल्ल्याला इस्रायल कधी प्रत्युत्तर देणार या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. अखेर इस्रायलने शनिवारी पहाटे भीषण हवाई हल्ला केला आहे. इराणच्या लष्करी तळांवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात इराणचे नेमके किती नुकसान झाले या बाबत इस्रायलने अद्याप माहिती जारी केली नाही. मात्र, इराणच्या लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आल्याचं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं असून या बाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
इस्रायलने गाझा पट्टीत हमास विरोधात लष्करी कारवाई केल्यानंतर हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले होते. या विरोधात इस्रायलने लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी टॉकीत स्फोट करून हिजबूल्लाच्या अनेकांना ठार मारले होते. तसेच लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करत हिजबुल्लाच्या टॉप कमांडरला ठार मारले होते. या मुळे चिडलेल्या इराणने इस्रायलवर १ ऑक्टोबर रोजी २०० आंतर खंडीय क्षेपणास्त्र डागले. इराण सरकार आणि इराणचा पाठिंबा असलेली हिसबूल्लाने इस्रायलला लक्ष केले आहे. यामुळे इस्रायल ७ ऑक्टोबरपासून सात आघाड्यांवर लढत आहे. यात इराणच्या भूमीवरून होणाऱ्या थेट हल्ल्यांचाही समावेश आहे. जगातील इतर सर्व सार्वभौम देशांप्रमाणे इस्रायललाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर इस्रायल इराणला कधी आणि कसे प्रत्युत्तर देतील या कडे सर्व जगाचे लक्ष लागून होते.
आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायलचे लष्कर इराण विरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. इस्रायल आणि जनतेच्या रक्षणासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करू. त्यानुसार आज इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती अद्याप इस्रायलने जाहीर केलेली नाही.
इराणच्या नेत्यांनी इस्रायलचा संभाव्य हल्ला झाल्यास युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले होते. त्यामुळे या युद्धाची तीव्रता वाढणार आहे. न्यूयॉर्क टाईम्सने इराणच्या चार अज्ञात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला रणनीती आखण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाल्यास इराण याला प्रत्युत्तर देईल, असे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रायलने महत्त्वाच्या पायाभूत सुविधा किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्यास इराणकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा देखील इराणने दिला आहे.
जर इराणवर हल्ला झाल्यास एक हजार क्षेपणास्त्रे डागणे, इराणसमर्थक गटांकडून इस्रायलवर हल्ले करणे आणि पर्शियन आखात आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारा ऊर्जा पुरवठा इराण खंडित करण्याची शक्यता आहे.
इराणने १ ऑक्टोबर रोजी इतिहासात दुसऱ्यांदा इस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १८० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात इस्रायलचे कोणतेही नुकसान झाले नाही. या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे, तर इस्रायलने नुकसान कमी असल्याचे म्हटले आहे.