Reactions on Union Budget 2024 : एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. सीतारामन यांचं भाषण संपताच विरोधकांनी बजेटवर टीकेची झोड उठवली आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेलं झुकतं माप पाहून विरोधक संतापले आहेत. हे बजेट फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी होतं का? एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी काय आणलं,' असा सवाल विरोधकांनी केला आहे.
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजप सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं भाजप सरकारनं आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचं द्योतक होतं, असा टोलाही रोहित पवार यांनी हाणला आहे.
हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेली bargaining आणि पाठपुराव्याचं हे फलित म्हणावं लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, अशी बोचरी टीकाही रोहित पवारांनी केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं, ठेंगा!, असं राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देतं हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडं दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं?, असा सवाल त्यांनी केला आहे.
टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य. महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या