१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. त्यांनी आज (मंगळवार) आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली. त्यांच्या बॅचचे माजी पोलीस महासंचालक रजनीश शेट डिसेंबर महिन्यात निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चेअरमनपदी करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाची सुत्रे घेतली. रजनीश सेट निवृत्ती झाल्यापासून महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच होता.
रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारताच म्हणले की, पुन्हा नव्याने व सकारात्मक दृष्टीने कामाची सुरूवात करणार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षेला प्राधान्य असेल. तसेच सायबर गुन्हेगारी कमी करण्याकडे देखील लक्ष देणार असल्याचे त्या म्हणाल्या. महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी काम करणार असल्याचं शुक्ला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून काम केलं आहे. याआधी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख तसेच त्या पुणे पोलीस आयुक्तही राहिल्या आहेत.
पत्रभार स्वीकारताना रश्मी शुक्ला म्हणाल्या की, मी सकारात्मक दृष्टीने डीजीपी पदाचा चार्ज घेत आहे. महाराष्ट्र पोलीस कोणत्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही. अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. लहान मुलं गुन्हेगारीकडे वळणार, नाहीत याकडेही आमचं लक्ष असेल, असंही रश्मी शुक्ला म्हणाल्या.