Man Beaten To Death For Celebrating Rohit Sharma Wicket: मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर सेलिब्रेशन करणे चेन्नईच्या सुपरकिंग्जच्या चाहत्याच्या जीवावर बेतले. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई इंडियन्सच्या दोन चाहत्यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, बंडोपंत बापूसो तिबिले (वय, ६३) असे हत्या झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्याचे नाव आहे. तर, बळवंत महादेव झांजगे (वय, ५०) आणि सागर झांजगे (वय, ३५) असे अटक करण्यात आलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे नाव आहेत. आरोपी बुधवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना पाहत होते. या सामन्यात हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध धावांचा मोठा डोंगर उभा केल्याने मुंबई समर्थक बळवंत आणि सागर रागात होते. मात्र, तरीही रोहित शर्मा मुंबईला विजय मिळवून देईल, असा त्यांना विश्वास होता. त्यावेळी चेन्नईचे समर्थक बंडोपंत तिथे पोहोचले आणि काही वेळातच रोहित शर्मा आऊट झाला. रोहित शर्मा आऊट झाल्याने बंडोपंत सेलिब्रेशन करू लागले. यावर संतापलेल्या बळवंत आणि सागर यांनी बंडोपत यांना जबर मारहाण केली.
या घटनेत बंडोपंत यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. यानंतर नागरिकांनी त्यांना प्रथमोपचारसाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेत बंडोपंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी सायंकाळी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
बंडोपंत यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ संजय यांनी बळवंत आणि सागर यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर करवीर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. हत्येचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.