आयफोन १६ लाँच होण्यास अजून काही महिने शिल्लक आहेत . मात्र, यापूर्वीच या मॉडेलसंदर्भात काही गोष्टी सोशल मीडियावर लीक होत आहेत. सध्या सर्वजण आयफोन १६ सीरिजच्या डिझाइनबद्दल बोलत असतानाच आयफोन १६ प्रोच्या रंगाबाबत माहिती समोर आली आहे. टिप्सटरने संकेत दिले आहेत की, आयफोन १५ प्रो सीरिजप्रमाणेच यात टायटॅनियम फ्रेम असेल आणि आयफोन १६ प्रो मॉडेलमध्ये नवीन रंग पर्याय येऊ शकतात.
माजिन बू च्या एक्स पोस्टनुसार, आयफोन १६ प्रोमध्ये टायटॅनियम ग्रे आणि डेझर्ट टायटॅनियम अशा दोन नव्या रंगात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. डेझर्ट टायटॅनियम हा आयफोन १४ प्रो गोल्ड कलर व्हेरियंटचा डार्क व्हर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सिमेंट ग्रे (टायटॅनियम ग्रे) आयफोन ६ च्या रंगासारखाच असल्याचे म्हटले जात आहे. पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, इतर संभाव्य रंगांवर देखील चर्चा केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
आयफोन १६ सीरिज संपूर्ण आयफोन १५ प्रो कलर स्कीमची जागा घेईल की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अॅपल त्यांच्या नव्या मॉडेल्सच्या आयफोनसाठी काय योजना आखत असेल हे पाहावे लागेल. संपूर्ण आयफोन १६ सीरिजमध्ये व्हर्टिकल कॅमेरा प्लेसमेंटच्या बाबतीत बदल होऊ शकतो, अशी माहिती आहे. आयफोन १६ सीरिज लाँच होण्याची वाट पाहणाऱ्या आयफोन चाहत्यांमध्ये या डिझाइनमुळे बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. यावर्षी अॅपल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) दुनियेत ही प्रवेश करू शकते आणि आपल्याला काही नवीन खास फीचर्स देखील अनुभवता येतील.
लक्षात घ्या की वरील आयफोन १६ प्रो रंग पर्याय लीक आणि अफवांवर आधारित आहेत आणि ते प्रत्यक्षात रोलआउट केले जातील. अॅपल आपल्या आगामी फोनचे कोणतेही पैलू लीक न करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने लाँचिंगच्या वेळी अंतिम खुलासा केला जाईल.