Badlapur school case : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जनक्षोभ झाला. पालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून येत मोठे आंदोलन केले. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन रात्री पर्यंत सुरू होते. या आंदोलनामुळे संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यानंतर रात्री परिस्थिती निवळली होती. आज बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त ठेवला आहे. इंटरनेट बंद ठेवण्यात आले असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळ पासून लोकल सेवा सुरळीत असल्याची माहिती आहे.
बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मंगळवारी नागरिकांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनावरून आरोप प्रत्यारोप देखील झाले. मात्र, संतप्त पालकांनी त्यांची मागणी लावून धरत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी लावून धरली होती. सुरवातीला शाळेपूढे आंदोलन करण्यात आले. यानंतर थेट बदलापूर स्थानकात आंदोलक जात त्यांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ही ठप्प होती. तर अनेक गाड्या या वळवण्यात आल्या होत्या. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शाळेवर व पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळ देखील केली. पोलिस आंदोलकांना सांजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी पोलिसांनी रात्री आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवले.
बदलापूर शहरात आज सकाळ पासून तणावपूर्ण शांतता आहे. मोजकेच नागरिक घरबाहेर पडले आहे. रेल्वे स्थानकावर देखील गर्दी कमी आहे. पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात चौका चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सोशल मिडियावरून खोटा प्रचार होऊन पुन्हा जनक्षोभ उसळू नये या साठी खबरदरीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा काल रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. बदलापुरातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. शहरातील जनजीवन सुरळीत सुरू आहे. बदलापूर स्थानकावरही कमी गर्दी आहे. अजूनही बदलापुरात काही अंशी तणावाचं वातावरण आहे.
काल आंदोलनामुळे बदलापूर येथील रेल्वेसेवा ठप्प झाली होई अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या होत्या तर काही गाड्या या वळवण्यात आल्या होत्या. आज लोकलसेवा पूर्व पदावर आली आहे. तसेच स्थानकावर देखील मोजकीच गर्दी पाहायला मिळत आहे.