Viral News: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रजत दलाल यांचा एक व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत तो दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने कार चालवताना दिसत आहे. एनएचपीसी चौकाजवळ कार एका दुचाकीला धडकते, पण हे रोजचे काम असल्याचे सांगून तो पुढे जातो. पोलिसांनी रजत दलाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये गाडी चालवताना दिसणारी कार एका शोरूमची आहे. रजत दलाल त्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर एक तरुणी बसली आहे. ती शोरूमची कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडिओनुसार, रजत दलाल १४० किमी प्रतितास वेगाने कार चालवत आहे. त्याच्या शेजारी बसलेली तरूणी गाडीचा वेग कमी करायला सांगते. पण रजत दलाल काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. पुढे जाऊन तो एका दुचाकीला धडक देतो. दुचाकीला धडक दिल्यानंतर बाजूला बसलेल्या तरुणीने दुचाकीस्वार खाली पडला आहे, असे त्याला सांगितले. पण तो काळजी करू नकोस, हे रोजचे काम आहे, असे तिला बोलतो. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रजत दलाल विरोधात धोकादायक पणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोक रजत दलालवर कारवाईची मागणी करत आहेत. लोकांनी फरिदाबाद पोलिसांना टॅग करत विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहते. मानवी जीवनाचे मोल न समजणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. रजत दलाल हा फरिदाबाद येथील बल्लभगडमध्ये कुटुंबासह राहतो. तो पॉवरलिफ्टर आणि फिटनेस इन्फ्लुएंसर आहे. पर्सनल ट्रेनर आणि पॉवरलिफ्टर म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. इन्स्टाग्रामवर त्याचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.