industry in chakan : आटोमोबाईल उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या चाकण उद्योगनगरीत सध्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीत झाली आहे. यामुळे अवजड वाहने ही रस्त्यावर अडकून पडत असल्याने वेळेवर डिलिव्हरी होत असल्याने उद्योगांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे येथील उद्योग स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.
चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिवहन, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी चाकणमध्ये असणाऱ्या अनेक असुविधांबद्दल कंपण्यांच्या प्रतिनिधिंनी चर्चा केली. सर्वांनी येथील वाहतूक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. बेशिस्त वाहतूक, रस्त्यांवर असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव, नाशिक फाटा ते राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, चाकण, शिक्रापूर या रस्त्यांचे रखडलेले काम यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने कामगार वेळेवर कंपनीत पोहचू शकत नाहीत तसेच कच्चा माल कंपन्यांमध्ये पोहोचण्यासाठी देखील विलंब होत असल्याने याचा परिमाण कंपन्यांच्या उत्पादकतेवर होत असून यामुळे येथील उद्योगांची बाहेर पडण्याची मानसिकता असल्याची भावना यावेळी उद्योजकांच्या प्रतिनिधींनी केली. कंपन्यांनी त्यांचे उद्योग गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमध्ये हलवण्याच्या तयारीत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले की, बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. चाकण परिसरात पायाभूत सुविधा देखील नाहीत. याचा फटका कंपन्यांच्या उत्पादनाला बसत आहे. त्यामुळे उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
सहायक पोलीस आयुक्त कसबे म्हणाले की, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे देखील अडचणी येत असून यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांनी वॉर्डन द्यावे. असे झाल्यास काम करणे सोपे होऊन वाहतूक कोंडी सोडवता येईल.
माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर म्हणाले, अपघात होण्यामागे बहुतेक वेळा माणसाचा स्वतःवरील ताबा नसणे, बेशिस्त वाहतूक अशा गोष्टी कारणीभूत आहेत. अपघातांमध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर त्या व्यक्तीचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कामगारांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण जबाबदारीने व वाहतुकीचे सर्व नियम पाळून कामावर जावे.