मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर दोन विमाने धोकादायकरित्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. ज्या धावपट्टीवरून दुसरे विमान उड्डाण घेत होते, त्याच धावपट्टीवर एक विमान उतरताना दिसत आहे. इंडिगो आणि एअर इंडियाचे विमान रनवेवर एकमेकांच्या खूपच जवळ आली होती. दोन्ही विमानांची धडक होता-होता वाचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोची फ्लाइट एअरपोर्ट रनवेवर लँडिंग करत होती तर त्याचवेळी एयर इंडियाचे विमान टेक ऑफ करण्यासाठी रनवेवरून धावत होते.
इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून येणारे इंडिगोचे विमान ६ ई ५०५३ धावपट्टीवर उतरले आणि एअर इंडियाचे एआय ६५७ विमान तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असताना शनिवारी पहाटे मुंबई विमानतळावरील धावपट्टी क्रमांक २७ वर ही घटना घडली.
विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफच्या जवळच्या वेळेमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि मोठी दुर्घटना घडू शकली असती.
मात्र, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) तातडीने कारवाई करत एअर ट्रॅफिक कंट्रोलचे (एटीसी) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित केले आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याच्या या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार दोन्ही विमाने एकाच धावपट्टीवर दिसत आहेत. एअर इंडियाचे विमान टेक ऑफ करताच इंडिगोचे विमान उतरताना दिसत आहे.
मुंबई आणि दिल्ली विमानतळ हे अतितीव्रतेचे विमानतळ असून, येथे ताशी ४६ उड्डाणे होतात. विमाने आणि प्रवाशांचे सुरक्षित आगमन आणि प्रस्थान राखण्याची जबाबदारी एटीसीओवर असते. व्हायरल व्हिडिओमध्ये व्हिजिबिलिटी चांगली दिसत आहे. एटीसी गिल्ड इंडियाचे सरचिटणीस आलोक यादव यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
इंडिगोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदूर-मुंबई विमानाच्या पायलटने एटीसीच्या सूचनांचे पालन केले. ८ जून २०२४ रोजी इंदूरहून निघालेल्या इंडिगोच्या ६ ई ६०५३ या विमानाला एटीसीने मुंबई विमानतळावर लँडिंग क्लीअरन्स दिले होते. पायलट इन कमांडने अप्रोच आणि लँडिंग चालू ठेवले आणि एटीसीच्या सूचनांचे पालन केले. इंडिगोमध्ये प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि असून आम्ही प्रक्रियेनुसार या घटनेची माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या