Indias Got latent : रणवीर अलाहाबादिया याच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या यूट्यूब शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखीजासह चौघांची बुधवारी चौकशी करत त्याचे जबाब नोदवून घेतले. खार पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलाहाबादियाहि याचा जबाब नोंदविला जाऊ शकला नाही. मुखीजा या रिॲलिटी शो ची भाग होती. अपूर्वा आणि आशिष चंचलानी यांनी या शोबद्दल सांगितले आहे की, हा शो स्क्रिप्टेड नाही आणि परीक्षकांना मानधन दिले जात नाही.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मुखीजा आणि यूट्यूबर आशिष चंचलानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, हा शो स्क्रिप्टेड नाही. शोमध्ये परीक्षक आणि स्पर्धकांना मोकळेपणाने बोलण्यास सांगितले जाते. इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये परीक्षकांना मानधन दिले जात नाही. मात्र, परीक्षकांना शोचा कंटेंट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिकिटे विकत घ्यावी लागतात आणि तिकीट विक्रीतून मिळणारे पैसे शोच्या विजेत्याला दिले जातात.
महाराष्ट्र सायबर विभागाने शो विरोधात मंगळवारी एफआयआर दाखल केला होता. हा वाद निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे पदाधिकारी नीलोत्पल मृणाल पांडे यांनी अलाहाबादिया आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अलाहाबादिया आणि शोच्या इतर स्पर्धकांविरोधात एफआयआर दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. रिॲलिटी शोमध्ये दिव्यांगांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा दावाही पांडे यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले की, ते स्वत: शारीरिकदृष्ट्या अपंग असून या प्रकरणी शोच्या स्पर्धकांवर कारवाई करण्यात यावी. 'इंडियाज गॉट लॅटेंट' या कॉमेडी शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि इतरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांना १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अलाहाबाद, समय रैना, अपूर्वा मखीजा, जसप्रीत सिंग आणि आशिष चंचलानी यांसारख्या कंटेंट क्रिएटर्सनी केलेल्या अश्लिल आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. एनसीडब्ल्यूने शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांनाही नोटीस पाठवली आहे.
रणवीर अलाहाबादिया याने या शो मध्ये आई-वडील आणि लैंगिक संबंधांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. कॉमेडियन समय रैनाच्या यूट्यूब रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट लॅटेंट'मध्ये अलाहाबादने एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांबद्दल आणि लैंगिक संबंधांबद्दल प्रश्न विचारून वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे अनेकांनी त्याच्या पॉडकास्टवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
अलाहाबादियाचे एक्सवर सहा लाखांहून अधिक, इन्स्टाग्रामवर ४५ लाखांहून अधिक आणि युट्यूब चॅनेलवर १०.५ दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर युट्यूबर अलाहाबादिया यांनी माफी मागितली आणि आपल्याला कॉमेडी येत नसल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या