suspicious boat in arebian sea : रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेल्या संशयास्पद बोटीला भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं आहे. ही बोट मुंबईच्या भाईंदर येथील मच्छिमारांचीच असून खोल समुद्रात गेल्यामुळं बोटीचा संपर्क तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याच्या केवळ अफवा असल्याचंही निष्पन्न झालं आहे. मुंबई आणि पालघरच्या समुद्र किनाऱ्यापासून ४४ नॉटिकल मैल अंतरावरून भारतीय नौदलानं संशयास्पद बोट ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जलराणी असं या मच्छिमार बोटीचं नाव असून ती भाईंदर येथील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली होती, त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आज दुपारी समोर आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस, सागरी पोलीस आणि तटरक्षक दलानं अलर्ट जारी करत बोटीचा शोध सुरू केला होता. परंतु आता ताब्यात घेण्यात आलेली बोट ही भाईंदरच्या उत्तन येथील असल्याचं तपासात समोर आलं आहे. दोन वर्षांपूर्वी या बोटीला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा बँकेमार्फत अर्थसाहाय्य केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे. सापडलेल्या बोटीत नऊ खलाशी असून त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यानंतर तपास यंत्रणांकडून त्यांची सुटका करण्यात आली आहे.
मुंबईच्या किनाऱ्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीत झारखंड आणि छत्तीसगडमधील खलाशी होते. त्यांची तपासणी केल्यानंतर तटरक्षक दलानं त्यांना पुन्हा उत्तन येथे जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आता रात्री आठ वाजेच्या सुमारास ही बोट उत्तनमध्ये पोहचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या