Indian Army Promotion : भारतीय लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पद्धतीत आता काही बदल केले आहेत. यापुढे सर्व लेफ्टनंट जनरलची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारे तयार करण्यात येणार आहे. हा नवा नियम ३१ मार्चपासून लागू होणार असून गुणवत्तेवर आधारित निवडीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा नवा बदल लागू केला जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भारतीय लष्कराला इंटिग्रेटेड थिएटर कमांडमध्ये काम करण्यासाठी लेफ्टनंट जनरलच्या निवडीसाठी मदत होणार आहे.
हे नवे धोरण लेफ्टनंट जनरलसाठी सुधारित वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) फॉर्मअंतर्गत लागू करण्यात येणार आहे. लष्कराने लागू केलेले हे नवे धोरण लष्कराच्या सहा ऑपरेशनल कमांड आणि एका ट्रेनिंग कमांडच्या व्हाइस चीफ आणि कमांडर-इन-चीफला लागू होणार नाही. भारतीय लष्करात सुमारे ११ लाख सैनिक आहेत. लष्करात ९० हून अधिक लेफ्टनंट जनरल, ३०० मेजर जनरल आणि १२०० ब्रिगेडियर आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन धोरणामुळे भारतीय लष्कर भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाशी जुळवून घेईल. आतापर्यंत लेफ्टनंट जनरलसाठी एसीआर यंत्रणा नव्हती. त्यांना आता विविध गुणांच्या आधारे १ ते ९ या स्केलवर मानांकन देण्यात येणार आहे. त्यांची पदोन्नती केवळ ज्येष्ठतेवर अवलंबून राहणार नसून त्यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे देखील त्यांची पदोन्नती होणार आहे. थिएटर कमांडच्या निर्मितीसाठी लष्कराच्या सर्वोच्च पदांवर तिन्ही दलांसाठी एकसमान मूल्यमापन प्रणाली आवश्यक होती.
उप लष्करप्रमुख आणि सात लष्करी कमांडर-इन-चीफच्या निवडीसाठीही हे धोरण लागू होईल की नाही, हे लष्करमुख्यालयाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. सध्याच्या लष्करी धोरणानुसार कमांडर-इन-चीफ पदावरील पदोन्नती ही पूर्णपणे ज्येष्ठतेवर अवलंबून असते. यात जन्मतारीख आणि उपलब्ध पदांचाही विचार केला जातो. लष्कराच्या १४ व्या कोअरपैकी एका कोअरचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट जनरलला कमांडर-इन-चीफ म्हणून बढती मिळण्यासाठी किमान १८ महिन्यांची सेवा कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे.
काही अधिकारी नव्या धोरणाला विरोधही करत आहेत. लष्कराच्या कडक रचनेच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेनुसार मोजकेच अधिकारी पात्र ठरवले जातात आणि ते थ्री स्टार जनरल बनतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लेफ्टनंट जनरल पदानंतर कमांडर-इन-चीफ पदावर पदोन्नती सेवाज्येष्ठतेवर अवलंबून होती. या टप्प्यावर गुणवत्तेचा समावेश केल्यास निवडीमध्ये हस्तक्षेपाची शक्यता वाढू शकते, मग ते राजकीय असो किंवा इतर. भारताने चीन, पाकिस्तान आणि हिंदी महासागर क्षेत्रासाठी तीन थिएटर कमांड तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.