Mood of the Nation Survey : देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून लोकांचा कल काय आहे हेही तपासलं जाऊ लागलं आहे. महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही. 'मूड ऑफ द नेशन' नावानं झालेल्या एका सर्व्हेतून महाराष्ट्रातील मतदारांचा कल समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) मात देईल असं चित्र आहे.
देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. केवळ सत्ताच नव्हे तर भाजपप्रणित एनडीए आघाडी ४०० हून अधिक जागा जिंकेल असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. तर, विरोधक सत्तांतराचा दावा करत आहेत. ‘मूड ऑफ द नेशन सर्व्हे’तून समोर आलेले निष्कर्ष मात्र दोघांचीही झोप उडवणारे आहेत.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत बरंच राजकारण घडून गेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात उभी फूट पडून त्यातील एक गट भाजपला जाऊन मिळाला आहे. हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपचाच हात आहे हे लपून राहिलेलं नाही. मात्र, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार सोबत येऊनही भाजपला फायदा होणार नाही, असं सर्व्हेतून पुढं आलं आहे.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यातील २६ जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि भाजपप्रणित महायुतीला २२ जागा मिळतील. महाराष्ट्रात काँग्रेस १२ जागा जिंकेल अशी स्थिती आहे. तर, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मिळून १४ जागा जिंकेल, असं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. राज्यात महाविकास आघाडीला ४५ टक्के तर महायुतीला ४० टक्के मतं मिळतील. उर्वरित १५ टक्के मत इतर पक्ष व अपक्षांना मिळतील, असं आकडेवारी सांगते.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यात २३ जागा भाजपनं तर १८ जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. विरोधकांच्या वाट्याला केवळ ७ जागा आल्या होत्या. मात्र, तेव्हा शिवसेना एकसंध होती. आता शिवसेनेत फूट पडली असून १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजपच्या आघाडीत गेले आहेत. तर, ६ खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडं आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार सध्या अजित पवारांसोबत भाजपच्या आघाडीत गेला आहे. ही गोळाबेरीज केल्यास महायुतीच्या सध्याच्या खासदारांचा आकडा ४५ च्या पुढं जातो. मात्र, पुढील निवडणुकीत हा आकडा टिकवणं कठीण जाईल, असं सर्व्हेची आकडेवारी सांगते.