काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर झाली. यानिमित्त शिवतीर्थावर इंडिया आघाडीची भव्य सभा पार पडली. यामध्ये देशभरातून आलेल्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीच्या सभेत बोलण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ मिळाला कारण त्यांच्यासोबत आमदार, खासदार आणि शिवसैनिक राहिले नसल्याने त्यांची पत तेवढीच राहिली आहे.
उद्धव ठाकरे यांनीभाषण करताना हिंदू बांधवांनो शब्द वापरला नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणायला आधीच त्यांची जीभ कचरत होती, आता हिंदू बांधवांनो हा शब्दही गाळला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच आम्हाला त्यांना सोडावं लागले, असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा लगावला.
राहुल गांधींनी हिंदू धर्मातील शक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदू धर्मात नारीशक्ती आहे, साडेतीन शक्तीपीठं आहेत, राहुल गांधी हे सगळं संपवणार आहेत का? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
इंडिया आघाडीच्या सभेवर बोलताना शिंदे म्हणाले की, मुंबईतील इंडियाची सभा एक प्रकारचे कौटुंबिक स्नेहसंमेलन होते. नैराश्येत असणारे सगळे लोक एकत्र जमले.कोणी उत्तर प्रदेशातून, कोणी बिहारमधून तर कोणी जम्मू-काश्मिरातून बईत येऊन मोदी द्वेष आलापला. ज्या लोकांना जनतेने तडीपार केलं असे लोकही येथे आले होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आज केंद्र आणि राज्याच्या डबल इंजिन सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले असून शेतकरी, महिला आणि समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. सरकारच्या कामकाजाबद्दल मी समाधानी आहे. आम्ही कोणावर टीका-टिपण्णी करण्यापेक्षा कामावर लक्ष देतो.