Beed News : बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपला पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन पक्षाच्या एका उमेदवाराला काळे फासून चाबकाचे फटके दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवार सचिन चव्हाण असे मारहाण करण्यात आलेल्या वंचित बहुजन पक्षाच्या उमेदवाराचे नाव आहे.
बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीने उभा केलेल्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. यामुळे वंचित बहुजन आघाडीने सचिन चव्हाण यांना पाठिंबा दिला होता. मात्र, पाठिंबा जाहीर होताच चव्हाण यांनी भाजपच्या स्थानिक उमेदवाराला पाठिंबा दिला. उमेदवाराच्या या कृत्यामुळे वंचित बहुजन कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यामुळे चव्हाण यांना भर चौकात उभे करून आधी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासले. यानंतर त्याला चाबकाने फटके दिले. त्याने भाजपला पाठिंबा दिल्याने आपण हे कृत्य केल्याचं या पदाधीकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानं केलेल्या कृत्याचा निषेध करायचा म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळ फासत मारहाण केली.
या बाबत वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे म्हणाले, आम्ही आमचा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने सचिन भीमराव चव्हाण याला पाठिंबा दिला होता. मात्र, त्याने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्याच्या तोंडाला काळं फासून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार त्याने केला आहे, याच आम्ही निषेध केला आहे. चव्हाण याने या कृत्यातून बाळासाहेब आंबेडकर यांना धोका दिला आहे. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.