Chinchwad Bypoll : ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण माघार घेणार नाही; राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chinchwad Bypoll : ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण माघार घेणार नाही; राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम

Chinchwad Bypoll : ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण माघार घेणार नाही; राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम

Feb 10, 2023 03:36 PM IST

Chinchwad Bypoll : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. राहुल कलाटे हे उमेदवारीवर ठाम असल्यानं राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Rahul Kalate In Chinchwad Pune Bypoll
Rahul Kalate In Chinchwad Pune Bypoll (HT)

Rahul Kalate In Chinchwad Pune Bypoll : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपनं आश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस असल्यानं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी राहुल कलाटे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गळ घातली आहे. परंतु तरीदेखील राहुल कलाटे हे आपल्या उमेदवारीवर ठाम असल्यानं राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काही तासांनी संपणार असताना अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधल भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक लोकांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. परंतु मी चिंचवडच्या पोटनिवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं वक्तव्य अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केलं आहे. त्यामुळं आता कलाटे हे उमेदवारीवर ठाम असल्यानं चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या आश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात पोटनिवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

कसब्यातून दोन उमेदवारांची माघार...

पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून आम आदमी पार्टी आणि संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारानं माघार घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळं आता पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधासभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या