Pune News update : अमेरिकेत सुरू असलेल्या आयसीसीटी २० वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवले. यानंतर पुणेकरांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला. या जल्लोषाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुणेकर मोठ्या संख्येनं डेक्कन परिसरात एकत्र आले. यावेळी गाणी, घोषणा आणि फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. सोशल मिडियावर या जल्लोषाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. रंगतदार झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला ६ धावांनी लोळवले. यामुळे पाकिस्तानचा संघ या चषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा विजय होताच मोठ्या प्रमाणात पुणेकर मध्यरात्री डेक्कन परिसरात एकत्र आले. त्यांनी हाती भारताचे झेंडे घेतले. तर काही नागरिकांच्या हाती भाजपचे देखील झेंडे होते. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जमून रस्तावर जल्लोष करत पाकिस्तान विरोधी घोषणा देखील दिल्या.
रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला १२० धावांचे लक्ष्य दिले. पण, पाकिस्तानला ७ गडी गमावून केवळ ११३ धावाच करता आल्या. भारतीय संघाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीने हा सामना भारतीयांच्या परड्यात टाकला.
जसप्रीत बुमराहने ४ षटकात केवळ १३ धावा दिला तर ३ बळी घेतले. तर हार्दिक पंड्यानेही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून भारताला सामन्यात परत आणले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनीही १ विकेट घेत मोलाची कामगिरी केली. अर्शदीपनेच सामन्यातील शेवटचे षटक टाकले ज्यामध्ये पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या. पण या धावा काढण्यात पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला.
जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात गोलंदाजीकरत केवळ ३ धावा दिल्या. तर इफ्तिखारची विकेट देखील घेतली. २० व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ ११ धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले.
संबंधित बातम्या