भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
"कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचा अश्विनला पूर्ण पाठिंबा असेल", असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बीसीसीआय चॅम्पियन क्रिकेटपटू आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देतो. खेळाडूंचे आणि त्यांच्या नातेवाईक आणि प्रियजनांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या आव्हानात्मक काळातून जात असताना अश्विन आणि त्याच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती बोर्डाने केली आहे. बोर्ड आणि संघ अश्विनला आवश्यक ती मदत करत राहील आणि आवश्यकतेनुसार मदत देण्यासाठी त्याच्याशी संपर्कात राहतील.
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला आर अश्विनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अनेक खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाच सामन्यांची मालिका सुरु होण्यापूर्वीच हॅरी ब्रूकने वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून माघार घेतली. तर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याची माहिती होती. मात्र, काही दिवसानंतर विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून माघार घेतल्याची माहिती समोर आली.
या मालिकेत अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले. इंग्लंडचा जॅक लीचला गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला संघाबाहेर पडावे लागले. त्यानंतर भारताचा यष्टीरक्षक केएल राहुल देखील दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. भारताचा युवा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाला पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात तो संघाच्या प्लेईंगमध्ये भाग आहे.