Women and Child Development Department recruitment : बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १८ हजार ८८२ पदे भरली जाणार आहेत. याबाबत आज मंत्रालयात मंत्री अदिती तटकरे यांनी बैठक ठेतली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने तब्बल ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती अंतर्गत महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका व १२ हजार २४३ अंगणवाडी मदतनीस असे एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती केली जाणार आहे.
या संदर्भात आदिती तटकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये तटकरे यांनी म्हटलं आहे की, महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती केली जाणार आहे. १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री. कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या