Jayant Patil on Union Budget : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला आणि त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थ संकल्पांत विशेष घोषणा सीतारमण यांनी केल्या. या सोबतच बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेजची घोषणा देखील सीतारमण यांनी केली. यावरून विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाणी पुसले आहेत. येणाऱ्या निवडणुका पाहून यात घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, याची पूर्तता होईल का हा देखील प्रश्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली. दोन महिन्यात राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे जनतेला खुश करण्यासाठी त्यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे सर्व नेते हा अर्थसंकल्प विसरून जातील असे, पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात राज्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. राज्यासाठी कोणतीही विशेष घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना खैरात वाटण्यात आली. मात्र, राज्यातील शेतकाऱ्यांसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी काहीही या अर्थसंकल्पांत नाही. मध्ये कांद्याचा प्रश्न पेटला होता. या संदर्भात देखील अर्थसंकल्पांत काही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. या अर्थसंकल्पात राज्याला दुर्लक्षित करण्याच काम भाजपनं केला आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले, गरीब जनतेसाठी घरे बांधण्याची योजना जाहीर करण्यात आली आहेत.या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने ३ कोटी घरे बांधण्याची घोषणा केली. पण, गेल्या वेळी करण्यात आलेल्या घोषणेचे आणखी पैसे नागरिकांना मिळालेले नाहीत. पंतप्रधान निवास योजनेतील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील घरांसाठी देखील पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे अशा योजना अनेक आहेत. त्यांना कुठलाही प्रकारचा निधी नसल्याने जाहीर केलेल्या योजनांचे नेमके काय होणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.