सध्या लेखन व्यवहार फार चांगला नाही. साहित्य संमेलनात राजकीय नेते नकोत, परंतु राजकीय नेते सुध्दा साहित्यिक असतात, असा एक विचार मांडला जातो. कोणामुळे हा विचार पसरतो हे मी माझ्या अध्यक्षीय भाषणात सांगेन, असं परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य समंमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी मांडलंय. सासणेंनी घेतलेली भूमिका आता ते आपल्या भाषणातनं कशी मांडतात हे अवघ्या काही तासातच समजेल.
देशभरातील १ हजारहून अधिक मराठी साहित्यिक आणि कवींना या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन २२, २३ आणि २४ एप्रिल रोजी उदगीरच्या'महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयच्या' ३६ एकरच्या विस्तीर्ण प्रांगणात पार पडणार आहे.
९४ वे साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबरला नाशिक येथे पार पडले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच साहित्य संमेलन होणार आहे. ९४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते. करोना काळानंतर दोन वर्षाच्या खंडानंतर हे अधिवेशन भरले होते.
आजपासून उदगीर येथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे.यावेळेस अध्यक्षांचं भाषण काय असेल याकडे संमेलनातल्या साहित्यिकांचं लक्ष लागलेलं असतं. समाजामध्ये धार्मिक आणि प्रशासकीय कारणांमुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे याकडे भारत सासणे यांनी निरीक्षण नोंदवलं. यावर बोलण्याची एक लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे. मी अतिशय स्पष्टपणे माझ्या अध्यक्षीय भाषणातून यावर बोलणार आहे. लेखकांची स्वतःची एक ठाम भूमिका असावी असं आपलं मत आहे आणि माझ्या भाषणातनं मी ते मांडणार आहे असं संमेलनाध्यक्ष भारत सासणे म्हणाले आहेत.
आताची परिस्थिती विचित्र आहे. संपूर्ण व्यवस्था भीतीदायक आहे. सर्वसामान्य लोकांना बोलण्याची भीती आहे. धार्मिक तेढ, राजकारण, समाजकारण यावर मी १७ वर्षांपूर्वी कादंबरी लेखन केले आहे. लेखक हा द्रष्टा असतो. समाजातील घटनेबाबत विचार करतो. आजची परिस्थिती विचित्र आहे, लेखकाला सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी लागेल अशा शब्दात भारत सासणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संबंधित बातम्या