Pune murder news : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. अशीच एक घटना खडकवासला धारणाशेजारील कुडजे गावातील जंगलात घडली असून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाच्या काही अंतरावर जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ३५) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर सोमनाथ वाघ (वय ५२) असे खून करून आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. सुवर्णा ही आरोपीची दुसरी पत्नी होती. या प्रकरणी उत्तम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ३५) आणि सोमनाथ वाघ (वय ५२) हे दोघे नवरा बायको आहेत. त्यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सुवर्णा ही सोमनाथची दुसरी बायको आहे. सोमनाथ हा सुवर्णा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांची भांडणे होत होती. दरम्यान, रविवारी रात्री आरोपीने पत्नी सुवर्णा हिला खडकवासला धरणा शेजारील कुडजे गावातील जंगलात नेले.
या ठिकाणी सुवर्णा ही बेसावध असतांना त्याने तिच्या डोक्यावर दगडाने वार केले. तब्बल चार ते पाच वार केल्याने सुवर्णा ही गंभीर जखमी होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, सोमनाथ याने देखील मृतदेहापासून काही अंतरावर जंगलात दोरीच्या साह्याने झाडाला गळफास आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.