Pune saswad Crime news : पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एक गाडी कारखाना असून या कारखान्यात फोम मिक्सर यंत्राची सफाई करण्यासाठी दोन कामगार या यंत्रात उतरले होते. मात्र, यावेळी कारखान्याच्या यंत्रचालकाने मशीनमध्ये कुणी आहे का ? याची खातरजमा न करता मशीन सुरू केल्याने एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला तर दूसरा कामगार जखमी झाला आहे.
या प्रकरणी कारखान्याच्या यंत्रचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अर्षद अन्सारी (वय २७, रा. मनुकेरी, पलामु, झारखंड) असे मशीनमध्ये अडकून ठार झालेल्या कामगारांचे नाव आहे. तर कैलास भारत कौल (वय २१, रा. सध्या रा. वडकीनाला सासवड रस्ता, मूळ रा. रोहनीया, देवगाव, मध्यप्रदेश) असे जखमी झलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्यावर एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गादी कारखान्यातील यंत्रचालक अमित बल्लु धुर्वे (वय २५, सध्या रा. वडकीनाला, सासवड रस्ता, मूळ रा. बम्हनी, छिंदवाडा, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. वडकीनाला येथे स्नुज हब कम्फर्ट अँड स्लीप रेडीफाईन्ड ही गादी कंपनी आहे. या कंपनीत उशी तयार केली जाते. रविवारी (दि १) सर्व कामगार कंपनीत आले. दरम्यान, कौल व अन्सारी ही दोघे फोम मिक्सर यंत्रातील राहिलेला कापूस व कचरा काढण्यासाठी यंत्रात उतरले होते. दोघेही यंत्राची साफसफाई करत होते. यावेळी यंत्रचालक धुर्वे याने फोम मिक्सरमध्ये कुणी आहे की नाही याची खातरजमा केली नाही. त्याने अचानक यंत्र सुरू केले.
यावेळी कापूस साफ करत असलेले अन्सारी हे या यंत्रात अडकले. तर कौल याचा पाय यंत्रात अडकला. यामुळे तो जोरात ओरडला. यावेळी तातडीने यंत्र बंद करण्यात आले. कंपनीतील इतर कामगारांनी यंत्रात अडकलेल्या कौलला व अन्सारीला बाहेर काढले. यात अंसारीचा जागीच मृत्यू झाला. तर कौल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.