Pune Rangehilss crime news : पुण्यातील रेंजहिल्स येथील सिंबायोसिस महाविद्यालयाच्या वसतिगृहात खोलीत झोपलेल्या एका तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिस तपास करत आहेत.
आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४, रा. सिंबायोसिस बॉईज हॉस्टेल, रेंजहिल्स) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दास याने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, तक्रारदार तरुण हा रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस बॉईज हॉस्टेलमध्ये राहायला आहे. शनिवारी (दि २३) दास हा त्याच्या वसतीगृहाच्या खोलीत रात्री ८.३० च्या सुमारास झोपला होता. त्यावेळी हल्लेखोर वसतिगृहातील त्याच्या खोलीत जात त्याने प्लास्टिकच्या मगमध्ये ॲसिडसदृश रसायन ओतले तसेच झोपला असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर त्याने हे रसायन फेकले. यानंतर हल्लेखोर फरार झाला. दरम्यान, झोपेत असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर रसायन पडल्याने त्याला भाजले. यामुळे त्याने आरडाओरडा केला. त्याने दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दरवाजाची खोली बाहेरून बंद केली होती. दरम्यान, त्याच्या बाजूच्या खोलीतील सहकार्याने दरवाजा उघडला.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाने याबाबत तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रूईकर तपास करत आहेत. पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. खोडसाळपणातून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.