Pune 31st December Celebration: नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु असताना पुणेकर देखील नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र नव्या वर्षाचं स्वागत करताना कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासंदर्भातील काळजी घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून पुण्याच्या रस्त्यांवर ३ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. ३० तारखेच्या रात्रीपासूनच पुण्यात अनेक ठिकाणी थर्डी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि तपासणी सुरू झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला पुणेपोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत बंदोबस्त तैनात केला आहे. शहरभरात ३ हजारांवर पोलीस अमलदारांसह अधिकारी दक्ष राहणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक अमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील २७ महत्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह पॉइंट केले आहेत. बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
अमितेश कुमार म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून विविध नियमांची अमलंबजावणी केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हॉटेल पब, बार मालकांनी नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच अल्पवयीन मुलांना दारूची विक्री न करणे, वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. पबमधील गाण्यांचा आवाज इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही दक्षता घ्यावी. दरम्यान, खासगी पार्ट्यासह स्थानिकांनी शाळा, महाविद्यालय हॉस्टेल, रूग्णालय परिसरात आवाजाची मर्यादा न पाळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात आज मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी पाच नंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे आणि जिल्ह्यातील रेस्टो बार पहाटे पाच पर्यंत सुरू असणार आहे. अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात २१ पथके सज्ज करण्यात आले आहे. एक दिवसाचा परवाना घेऊन पार्टी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात तीन हजार दारूचे दुकाने आहेत. ते पहाटे पाच पर्यंत उघडे असणार आहे. बनावट दारू शहरात येण्याची शक्यता असल्याने विशेष पथके, विभागीय पथके, जिल्ह्याच्या सीमावर तैनात करण्यात आली आहे. पार्टी फार्म हाऊस, इमारतीचे टेरेस किंवा मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आली असल्यास मद्य प्राशन करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आवश्यक राहणार आहे. बनावट दारू प्रकरणी, भेसळ प्रकरणी आत्तापर्यंत ३८६ आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या