Nandurbar Accident: राज्यात आज भाऊबीज साजरी केली जात आहे. मात्र, या दिवशी नंदुरबार येथे एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नंदुरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ शनिवारी ८ च्या सुमारास झाला. एका भरधाव एका बोलेरोवरील चलकांचे नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला ३ मोटरसायकलसह उभ्या असलेल्या काही नागरिकांना चिरडले. या अपघातात ५ जण ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात कारचा देखील चक्काचूर झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या अपघातात योगेश कालूसिंग नाईक (वय ४०, रा.पिंपळोद, ता.नंदुरबार) राहुल धर्मेंद्र वळवी (वय २६, रा.पिंपळोद, ता.नंदुरबार), अनिल सोन्या मोरे (वय २४, रा. शिंदे, ता.नंदुरबार), चेतन सुनील नाईक (वय १२, रा.भवाली, ता.नंदुरबार), श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे (वय ४०, रा.पिंपळोद, ता.नंदुरबार) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
शनिवारी (दि २) रात्री ८ च्या सुमारास नंदुरबार ते धानोरा मार्गावर लोय पिंपळोद गावा पासून एक किमी अंतरावर एक मोटरसायकल बंद पडली होती. त्या व्यक्तीच्या मदतीसाठी काही जण आणखी दोन दुचाकींवर थांबले होते. दरम्यान, याच वेळी नंदुरबारकडून धानोरा कडे भरधाव वेगात जाणारी बोलेरो (जी.जे.०२, झेड.झेड.०८७७) या कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. यामुळे ही कार कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलसह नागरिकांना जाऊन धडकली. ही गाडी वेगात असल्याने अक्षरक्ष: सर्वांना चिरडत पुढे गेली. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देत घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बोलेरो गाडी उलटली होती. नागरिकांनी या गाडीला सरळ करत त्यात कुणी नाही या याची खात्री केली. अपघात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत टाहो फोडला.
ऐन दिवाळीत हा भीषण अपघात होऊन गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.