gold seized pune and nagpur : राज्यात प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतांना, निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी तपास पथकांनी कारवाई वेगवान केली आहे. नागपूर आणि पुण्यात शनिवारी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. नागपूरमध्ये तब्बल १७ किलो सोने आणि ५५ किलो चांदी जप्त करण्यात आली असून तब्बल १४ कोटी रुपयांचा हा मुद्देमाल आहे. तर पुण्यातील राजीव गांधी पुलावर केलेल्या कारवाईत देखील तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने व चांदी जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या पूर्वी पुण्यात १३२ कोटींचे सोने आणि चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा साथ हा तब्बल १४ कोटी रुपयांचा आहे. ज्या गाडीतून हे सोने नेल्या जात होते, त्या गाडीला अधिकाऱ्यांनी रोखले. गाडीची तपासणी केली असता, त्यात सोने आणि चांदीच्या विटा व दागिने सापडले. दरम्यान, गाडी चालकाची चौकशी केली असता, त्याच्या कडे कोणताही परवाना अथवा कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी संध्याकाळी नागपूर विद्यापीठ मार्गावर नाकाबंदी ठिकाणी करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेले वाहन हे सिक्वेल लॉजिस्टिक्स या पुरवठा कंपनीची आहे. या व्हॅनमध्ये १७ किलो सोने दागिने स्वरूपात आणि ५५ किलो चांदी ही विटांच्या स्वरूपात होती.
हे सोने व चांदी विदर्भातील काही सराफा व्यावसायिकांच्या ऑर्डर नुसार त्यांच्या दुकानाच्या पुरवठ्यासाठी नेली जात होती, अशी माहिती आहे. त्यासाठी सिक्वेल लॉजिस्टिक या दागिने वाहतूक करणाऱ्या कंपनीना याची जबाबदारी देण्यात आली होती. हे सोने व चांदीचे दागिने नागपूरसह अकोला, अमरावती अशा विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी सराफा व्यवसायिकांनी दिलेल्या ऑर्डर नुसार त्यांना पुरवठा करण्यासतही जात होते, या बाबतची कागदपत्रे व बिल हे सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीकडे असल्याची माहिती आहे. मात्र, वाहतुकीचा परवाना नसल्याने जप्त केलेला माल हा आयकर विभाग तसेच जीएसटी विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
पुण्यात देखील राजीव गांधी पुलाजवळ उतपास पथकाने शनिवारी एका वाहनातून तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने चांदी जप्त केले. ही कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या सोने चांदीची पडताळणी आयकर विभाग तसेच जीएसटी विभागामार्फत करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच.४३ बी के ५८०६ हे वाहन शनिवारी पहाटे पोलिसांनी थांबविले. त्यावेळी वाहनचालक योगेश कुमार परमार याच्याकडे चौकशी केली असता, त्यामध्ये तब्बल ४ लाख १६ हजार ६३२ रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी तसेच तब्बल १ कोटी ५७ लाख ९६ हजार १२४ रुपयांचे २ किलो ५२५ ग्रॅम सोन्याचे पार्सल निदर्शनास आले आहे. हे सोने तसेच चांदी विविध ज्वेलर्स यांनी मागविन्यात आले आहेत. ते पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कुरिअरमार्फत पोहोच करायचे आहेत. पोलिसांनी चालक तसेच वाहन ताब्यात घेऊन चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यात नेले असून याची माहिती आयकर विभाग आणि जीएसटी विभागाला देत याची तपासणी केली जात आहे.