Mumbai Accident : मुंबईत एका ४ वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला चिरडले. मुंबईतील वर्दळीचा भाग असलेल्या वडाळा येथे रविवारी हा अपघात झाला. पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. त्याचे वय अवघे १९ वर्षे आहे. आंबेडकर महाविद्यालयाजवळ आज सकाळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष लक्ष्मण किनवडे (वय ४) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर भूषण गोळे (वय १९) असे आरोपी कार चलकाचे नाव आहे. गोळे हा त्याची कार रिव्हर्स घेत होता. यावेळी रस्त्यावर खेळत असणाऱ्या आयुषला आरोपीने चिरडले. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपी संदीप गोळे विलेपार्ले येथील रहिवासी आहे. अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता का ? याचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत. त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच घटनास्थळाची परिस्थिती समजण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही देखील तपासत आहेत.
आयुष हा आपल्या कुटुंबासोबत फुटपाथवर राहत होता. त्याचे वडील मजूर आहेत. घटनेच्या वेळी आयुष रस्त्यावर खेळत होता. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पूर्वी ९ डिसेंबर रोजी मुंबईतील कुर्ला भागात झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४२ जण जखमी झाले होते. बेस्ट बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. या प्रकरणी बेस्ट चालक संजय मोरे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक रस्ते अपघात झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. २०१८ ते २०२२ या कालावधीत राज्यात रस्ते अपघातात ६६,३६० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूनंतर तिसरा क्रमांक लागतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सांगितले होते की, रस्ते अपघातात दरवर्षी १,७८,००० लोक मृत्युमुखी पडतात आणि ६० टक्के मृत्यू झालेल्यांचे वय हे १८ ते ३४ आहे.