Ganesh Visarjan : राज्यात लाडक्या गणरायाला जल्लोषात 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. दरम्यान, विसर्जन करतांना २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तर महाराष्ट्रात ९ , विदर्भात ७, तर विरारमध्ये १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १ तर नगर जिल्ह्यात २ व इंदापूरमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
राज्यात धुळ्यात चितोड येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने मिरवणूकीच्या गर्दीत शिरला. या दुर्घटनेत तीन बालकांसह एका तरुणी ठार झाली तर १० जण जखमी झाले. परी ऊर्फ दिव्यानी बागूल (वय १३), लाडु ऊर्फ आदित्य पवार (वय ३), शेरा सोनवणे-जाधव (वय ६), गायत्री पवार (वय २०) यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर, मुंबईच्या विरार पूर्वेच्या टोटाळे येथे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमित मोहिते (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. अमित हा विसर्जनासाठी टोटाळे तलावात उतरला होता. यावेळी त्याला फीटचा दौरा आल्याने तो पाण्यात बुडला. यावेळी त्याच्या सोबत आलेल्या काही जणांनी त्याला बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वीच बुडून व नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात देखील एका तलावात विसर्जन करतांना दोघांचा मृत्यू झाला. तर विदर्भात विविध घटनांमध्ये सात जणांनी जीव गमावला. विसर्जन करतांना अनेकांनी सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्याने या दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले. मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.नाशिकच्या पार्थर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. घरातील तरुण मुलांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून दोघेही जिवलग मित्र होती. ओंकार हा केटीएचएम महाविद्यालयात शिकत होता. तर, स्वयंम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.